मुंबई – जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन विद्यार्थिनींना 5 रुपयात 8 सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य व स्वच्छता याविषयी जनजागृतील करण्यासाठी राज्यात अस्मिता योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ 8 मार्च या जागतिक महिला दिनी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ग्रामविकास मंत्री मुंडे यांच्या दालनात आयोजित विविध विषयावरील बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांची उपस्थिती होती.
अस्मिता योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता सॅनिटरी नॅपकीनची मागणी नोंदवण्यासाठी तसेच पुरवठा करण्यासाठी विशिष्ट ॲप तयार करण्यात येणार असून ते ॲप सर्वसामान्य ग्रामीण महिला बचत गटाच्या सदस्यांना हाताळता यावे असे सोपे आणि साधे ॲप तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ॲपसंबंधात, मागणी व पुरवठा संबंधीत विषयावर संबंधितांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात असल्याचं त्या म्हणाल्या.
महाऑनलाईनद्वारे अस्मिता योजनेच्या लाभधारकांना अस्मिता कार्ड देण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्रव्यवहार करुन लाभार्थ्यांची संख्या मिळवावी, आधार आणि शाळेतील नाव, फोटो आदी बाबी घेऊन तात्काळ नोंदणी करण्यास सुरुवात करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
COMMENTS