परभणी – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत. काही मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. परंतु परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अजुन कायम असल्याचं दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपात
हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. परंतु राष्ट्रवादीला आतापर्यंत याठिकाणी यश आलेलं नाही. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांनी मोठे मताधिक्य घेतले होते, तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यंदाही राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी, अशी इच्छा पक्षाच्या नेत्यांची आहे. मात्र विजय भांबळे हे उत्सुक नसल्याने त्यांनी आपला नकार पक्षाला कळवला आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नावाची शिफारस जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांनी केली आहे. त्यामुळे विटेकर यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. विटेकरही लोकसभेच्या.तयारीला लागले असून ते मतदारसंघात फिरत आहेत. त्याचबरोबर विटेकर यांच्याशिवाय माजी खासदार गणेश दुधगावकरही पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. त्यांच्या पाठोपाठ अॅड. बाळासाहेब जामकर, माजी खासदार सुरेश जाधव हे इच्छुक असून पक्षाकडे आपल्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. पक्षाकडे उमेदवारी मागणारे नेते जास्त असले तरीही विजय भांबळे यांनीच निवडणूक लढवावी, असा सूर असल्याने अद्याप राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे हा पेच आता राष्ट्रवादीचे नेते कसा सोडवणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS