मंत्रालयात प्लास्टिक बॉटल विघटन यंत्रणा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

मंत्रालयात प्लास्टिक बॉटल विघटन यंत्रणा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

मुंबई – मंत्रालय आवारात प्लास्टिक बाटल्या नष्ट करणाऱ्या संयंत्रणाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम तसेच युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाने गुढिपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याचे धोरण जाहीर केले आहे. प्लास्टिक पिशव्या विविध प्लास्टिक आवरणे तसेच थर्माकोलमुळे नद्या-नाले तुंबून पुरस्थिती ओढावते व किनारे प्रदुषित होतात. यावर शासनाने ठोस कार्यवाही करण्याचे ठरवले असून पाणी तसेच शीतपेयाच्या बाटल्यांचे शंभर टक्के विघटन करून त्यांचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. या धोरणाला अनुसरूनच सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व उद्योग विभागाच्या पुढाकाराने मंत्रालय परिसरात प्लास्टिक बाटल्या विघटन संयंत्रणा कार्यान्वित केली आहे.

मंत्रालयात दररोज सुमारे दोन हजार रिकाम्या बाटल्या घनकचरा वाढवतात, हे लक्षात आल्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वॉटर बॉटल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनला आवाहन केल्यानंतर या संघटनेने एक संयंत्र दिले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्रामुळे प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यामुळे वाढणारा घनकचरा नष्ट होईल व यंत्राद्वारे चुर्ण झालेल्या कच्च्या मालाचा पुनर्वापर करून काही वस्तू तयार करता येणार आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक कचरा न राहता एक कमोडिटी म्हणून ओळखली जाणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी अशा यंत्रणाची राज्याला गरज आहे, असेही देसाई यांनी सांगितले.

या प्रसंगी वॉटर बॉटल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे सुनील जैन, भावेश धनेशा उपस्थित होते. मुंबई व परिसरातील बाटल्या निर्मिती कारखान्यात ही संयंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे श्री. जैन यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS