नवी दिल्ली – पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी सगळ्या देशाचे आभार मानले. माझ्यासाठी निवडणूक प्रचार हा जनतेला धन्यवाद देण्यासाठी होता हेच मी मानतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. आम्हाला जनतेचा आशीर्वाद हवा आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. आम्ही देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत आमच्या योजना पोहचवल्या याचा आम्हाला गौरव वाटतो असं मोदींनी म्हटलं आहे.
दरम्यान भारत हा जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे. जगावर आपल्या देशानं छाप सोडली पाहिजे असं मला वाटतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशात विविधतेतली एकता आहे आणि ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. प्रचाराचा खूप चांगला अनुभव होता. पूर्ण बहुमत मिळून त्या सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला ही गोष्ट अनेक वर्षांनी घडली असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेलं सरकार येईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
याआधी काहींना देशाचं नेतृत्त्व एक-दोन वर्षांसाठी सत्ता मिळाली किंवा एका परिवाराला सत्ता मिळाली. मात्र लोकांनी बहुमताने निवडलेलं सरकार पाच वर्षे चाललं ही बाब अनेक वर्षांनी घडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. तसेच देशाच्या जनतेचा कौल काय येईल ते २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. देशाच्या विकासाचे निर्णय आम्ही घेतो आहोत. यापुढेही घेऊ असंही मोदींनी म्हटलं आहे.
COMMENTS