नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावामागे श्री किंवा सन्माननिय लावायला विसरणं सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला चांगलंच महागात पडलंय. त्या जवानाच्या सात दिवसांचा पगार कापला जाणार आहे. पंतप्रधानांविषयी हा अनादर असल्याचा ठपका लावत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
याबाबत घडलेली हकीकत अशी की, 21 फेब्रुवारी रोजी सीमा सुरक्षा दलाच्या पश्चिम बंगालमधील हेडकॉर्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाची नेहमी प्रमाणे परेड सुरू होती. त्यावेळी जवान संजीव कुमार यांनी एक अहवाल देताना मोदी कार्यक्रम असा शब्द वापरला. त्यामुळे कमांडिग ऑफिसर अनुपलाल भगत यांनी त्या जवानाने पंतप्रधानांचा अवमान केला असं सांगत. त्याच्या पगारातून सात दिवसांचा पगार कापण्याची शिक्षा त्याला दिली. दरम्यान सीमा सुरक्षा दलातील अधिका-यांनीही ही शिक्षा अतिशय कडक आहे अशा शब्दात आपली नापसंती दर्शविली आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही बातमी समजताज त्यांनी याची तातडीने दखल घेतली. आणि त्या जवानाची शिक्षा रद्द करण्याचे आदेश दिले आहे. या शिक्षेच्या प्रकरणात मोदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशी प्रकारची शिक्षा करणं योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच ज्या अधिका-यानं ही शिक्षा सुनावली त्यालाही समज देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी दिली आहे.
COMMENTS