प्रशांत किशोर करणार भाजपचा प्रचार, 2014 प्रमाणे 2019मध्येही चालणार का जादू ?

प्रशांत किशोर करणार भाजपचा प्रचार, 2014 प्रमाणे 2019मध्येही चालणार का जादू ?

नवी दिल्ली – निवडणूक प्रचारतज्ज्ञ प्रशांत किशोर हे 2019 मधील निवडणुकांसाठी भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 2014 प्रमाणे आगामी निवडणुकीतही प्रशांत किशोर यांची जादू चालणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रशांत किशोर यांची मदत घेण्याबाबत सध्या भाजपमध्ये विचार सुरु असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान प्रशांत किशोर हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मदत करीत आहेत, तसेच आगामी निवडणुकांसाठी त्यांनी भाजपा नेत्यांशी संपर्क साधला असल्याची सूत्रांची माहिती आहे. गुजरातधील कसाबसा विजय, राजस्थानात पोटनिवडणुकांमध्ये पराभव आणि प्रादेशिक पक्षांनी सुरू केलेला वेगळा विचार, यामुळे भाजप प्रशांत किशोर यांची मदत घेणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान प्रशांत किशोर यांच्या प्रचार पद्धतीने २0१२ साली गुजरात विधानसभा निवडणुकांत व २0१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले होते. बिहारमध्ये जनता दल, राजद व काँग्रेस यांच्या महाआघाडीला यश मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर, काँग्रेसने पंजाब व उत्तर प्रदेशसाठी त्यांची मदत घेतली, पण उत्तर प्रदेशात काँग्रेस अपेक्षेप्रमाणे पराभूत झाला. पंजाबच्या काँग्रेसचा यशाचे श्रेयही कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मिळाले होते.

महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असून आंध्र प्रदेशात तेलुगू देसमही याच विचारात असल्याचं बोललं जात आहे. तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणामध्येही भाजपाला स्वत:ची खात्री नसल्यामुळे उत्तर भारतातील राज्यांवरच लक्ष्य केंद्रित करून पुन्हा विजय मिळविण्याचे भाजपाचे प्रयत्न असणार आहेत.

COMMENTS