नवी दिल्ली – भाजपसाठी आगामी निवडणुकांमध्ये 2014 सारखी लाट अडचणीत असल्याचं मत एकेकाळी भाजपाचे निवडणूक रणनीतीकार राहिलेले व सध्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) उपाध्यक्ष असलेले प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सध्या तरी भाजप आघाडीवर असला तरी निवडणुका १० ते १२ दिवसांत बदलतात. जर आज निवडणूक झाली तर भाजपाच सर्वांत मोठा पक्ष असेल यात कोणतीही शंका नाही. पण एकट्या भाजपाला २७२ जागा मिळणे कठीण असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आता लोक वस्तुस्थिती आणि दिलेल्या आश्वासनांवर बोलू इच्छितात. लोकानुनयी आश्वासने त्यांना नकोत. त्यामुळे मला वाटतं की, आगामी निवडणुकीत कोणतीही लाट नसेल. ही निवडणूक छोट्या-छोट्या मुद्यांवर लढली जाईल असंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
तसेच मला बिहारमध्ये काम करायचे होते. त्याचबरोबर नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या कामांमुळे मी खूप प्रभावित झालो. ते देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. जेडीयू एका छोटा पक्ष आहे. विचारधारेबाबत बोलायचे म्हटले तर त्यांची पाटी अजून स्वच्छ आहे. त्यामुळेच मी भाजप सोडला असल्याचंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
आगामी निवडणुकीत डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिका खूप महत्वाची असेल. २०१४ मध्ये देशात ४ ते ५ कोटी स्मार्टफोन्स होते. तीच संख्या आता वाढून ३५ ते ४० कोटी झाली आहे. तरीही देशातील ५० टक्के मतदार सोशल मीडियावर नाहीत. तरीही सोशल मीडियाची पुढील निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार असल्याचंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
COMMENTS