राम मंदीराच्या प्रश्नावर भाजप आता काँग्रेसची भाषा बोलत आहे – प्रवीण तोगडिया

राम मंदीराच्या प्रश्नावर भाजप आता काँग्रेसची भाषा बोलत आहे – प्रवीण तोगडिया

नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी राम मंदीरावरुन पुन्हा एकदा भाजपवर टीका केली असून राम मंदीराच्या प्रश्नावरुन भाजप आता काँग्रेसची भाषा बोलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राम मंदीरासाठी काँग्रेसनंच पहिलं आंदोलन केलं असून मुरादाबादमधील काँग्रेसचे नेते दाऊ दयाल खन्ना यांनी राम मंदिरासाठी आवाज उठवला होता. त्यानंतर राम मंदीरासाठी भाजपनं आवाज उठवला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पूर्णपणे बहूमत मिळालं तर राम मंदीर बनवणार असल्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. परंतु आता न्यायालयाच्या निर्णयानुसार राम मंदीर बनवणार असल्याची भाषा भाजपकडून केली जात आहे. त्यामुळे राम मंदीराच्या प्रश्नावरुन भाजप आता काँग्रेसची भाषा बोलत असल्याची टीका प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.

दरम्यान जर तुम्हाला न्यायालयाच्या निर्णयानुसार राम मंदीर बनवायचं होतं तर एवढी वर्ष आंदोलन का केलं? आणि एवढ्या जणांचा जीव का घेतला? असा सवालही प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. तसेच न्यायालयात सुरु असलेला खटला फक्त 1100 स्क्वेअर मीटरच्या जमिनीसाठी सुरु असून उरलेली अनेक एकर जमीन मुस्लिमांना मिळणार असल्याचंही तोगडिया यांनी म्हटलं आहे.

तसेच नरेंद्र मोदी हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येऊन गेले असून त्यांना मी अनेकवेळा स्कूटरवर बसून गुजरातमध्ये फिरवलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांना गुजरातमध्ये कोणी येऊ देत नव्हतं त्यावेळी त्यांच्यासोबत मी होतो. तसेच राम मंदीर आंदोलन सोडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव येत असून माझा आवाज दाबला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 2005 मध्ये मी नरेंद्र मोदींना भेटलो नाही परंतु आता भेटण्यासाठी त्यांना पत्र लहिलं असून या विषयावर बोलण्याची मागणी केली असल्याचंही तोगडिया यांनी म्हटलं आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये झालेला भाजपचा पराजय हा त्याठिकाणचे हिंदू नाराज असल्यामुळेच झाला असल्याचा दावाही तोगडिया यांनी केला आहे.

 

 

COMMENTS