पंतप्रधानांच्या मन की बात मधील “त्या” प्रश्नाची पोलखोल, एबीपी न्यूजने पुराव्यासह उघड केला खोटेपणा !

पंतप्रधानांच्या मन की बात मधील “त्या” प्रश्नाची पोलखोल, एबीपी न्यूजने पुराव्यासह उघड केला खोटेपणा !

दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला मन की बात हा कार्यक्रम करतात. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतात. या कार्यक्रमात पंतप्रधान देशभरातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असतात. गेल्या महिन्यात पंतप्रधांनी त्यांच्या मन की बातमध्ये असाच एक संवाद साधला. तो संवाद त्याच्या सत्यतेवरुन वादाच्या भोव-यात सापडला आहे. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील चंद्रमनी या शेतकरी महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं उत्पन्न किती वाढलं असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्या महिलेनं माझं उत्पन्न यावर्षी दुप्पट झाल्याचं म्हटलं होतं. शेतक-यांच्या शेतमालाला दीडपट भाव मिळावा यासाठी देशभर शेतकरी मागणी करत आहेत. ते देतानाच सरकारचा घाम निघत आहे. असं असताना त्या महिलेचं उत्पन्न दुप्पट कसं झालं असा प्रश्न पडतो. एबीपी न्यूजच्या एका पत्रकाराने त्या महिलेचा शोध घेतला आणि प्रत्यक्ष काय स्थिती आहे. याचा आढावा घेतला.

एबीबी न्यूजचा पत्रकार जेंव्हा चंद्रमनी या महिलेच्या गावात गेला तेंव्हा त्याच्यासमोर वेगळीच बाजू समोर आली. तुमचं उत्पन्न दुप्पट झालं आहे का ?  या प्रश्नावर चंद्रमनीने नाही असं उत्तर दिलं. मग त्यावेळी तुम्ही पंतप्रधानांच्या प्रश्नावर असं उत्तर कसं दिलं असा प्रश्न केला. चंद्रमनीने त्याचंही उत्तर दिलं. दिल्लीतील अधिका-यांची एक टीम त्या गावात गेली होती. त्यांनी पंतप्रधानाच्या प्रश्नांना काय आणि कशी उत्तरं द्यायची याचं ट्रेनिंगही घेतलं. त्यांनीच आपल्या उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगा असं सांगितलं होतं असंही चंद्रमनी यांनी सांगितलं. या प्रकारावरुन शेतकरी उत्पन्न दुप्पट झाल्याच्या त्या दाव्यातला फोलपणा समोर आला आहे.

त्या गावातील सरपंचानेही चंद्रमनी यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. पंतप्रधानांना उत्तरं कशी द्यायची आणि काय द्यायची यासाठी दिल्लीतील अधिका-यांची एक टीम आली होती हेही सरपंचांनी सांगितलं आहे. अशा प्रकारामुळे पंतप्रधानांच्या विविध प्रश्न उत्तराच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. हीच संधी साधत विरोधकांनी यावर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी एबीबीची ती बातमी ट्विट केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ही बातमी ट्विट केली आहे. सोशल मीडियावरही ती बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता भाजपचे नेते आणि सोशल मीडिया याला कसं उत्तर देतात ते पहावं लागेल.

COMMENTS