मुंबई – पुण्यातील पहिली सभा रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील खार येथे पहिली सभा पार पडली आहे. राज ठाकरे यांनी या पहिल्या सभेत मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष द्या, असं अनोखं आवाहन जनतेला केलं आहे. माझी विधानसभेची भूमिका आहे, एक मागणी करायला आलो आहे. राज्याला जी गरज आहे ती एक कणखर विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधीपक्ष नेता सरकारला नामोहरम करू शकतो. प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आज समोर आलो आहे. आता पर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाने ही मागणी केली नाही ती मी आज करतोय, असं राज ठाकरे यांनी या सभेदरम्यान म्हटलं आहे..
दरम्यान ज्यावेळी सत्ता आवाक्यात असेल तेव्हा सत्ता मागेल, पण आजच्या घडीला विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. या राज्याला सध्या कणखर प्रबळ विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये एक भूमिका घेतली आहे. तीच मी मांडणार आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी सगळेच सरकारवर नाराज आहेत. बँकांचे घोटाळे होत आहेत. ग्राहक बँकांबाहेर रडतात; पीएमसी बँकेचे संचालक भाजपशी संबंधित आहेच. शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. वर्षेनुवर्षे हेच सुरू आहे, विरोधी पक्षदेखील नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
पुण्यासारखे शहर अर्ध्या तासाच्या पावसात बुडते, शहर नियोजनाचं काय? शहराचा बिचका झालाय, रोजच्या रोज शहरं बरबाद होत आहेत. हल्ली प्रवासाला जास्त वेळ लागतोय आणि भाषणाला कमी वेळ मिळतोय, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS