राज ठाकरेंचं प्रशासन अधिका-यांना स्मरणपत्र !

राज ठाकरेंचं प्रशासन अधिका-यांना स्मरणपत्र !

मुंबई – गेली अनेक दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसेनं प्रशासनाला धारेवर धरल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेनं मुंबईतील स्टेशन्स, फूटओव्हर ब्रिज आणि गर्दीच्या वेळी बाहेर पडण्याच्या जागा या सगळ्या ठिकाणाहून फेरीवाले हटवण्याची मागणी केली होती. या मागणीवरुन अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा देखील केला होता. परंतु अजूनही काही ठिकाणी फेरीवाले रेल्वे स्टेशनच्या आवारत येत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. महापलिका, रेल्वे आणि पोलीस यंत्रणा यांना राज ठाकरे यांनी स्मरणपत्र पाठवून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापलिका आयुक्त, पोलीस आयुक्तांना तसेच सर्व प्रशासकीय अधिका-यांना हे स्मरणपत्र पाठवलं आहे.  तुमच्यावर न्यायालयाचा अवमान खटला दाखल करायची वेळ आणू नका, तुम्ही जनतेचे सेवक आहात, जनतेच्या मनातलं निश्चितपणे जाणता, माझी तुम्हाला विनंती आहे की, कायद्याचं आणि न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा. असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. तुम्हाला दोषारोप करण्यासाठी हे पत्र नाही. पूर्ण व्यवस्था भ्रष्ट आहे, चुकीची आहे असं माझं म्हणणं नाही. पण किरकोळ प्रलोभनांना बळी पडून कायद्याची चौकट मोडणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण द्यायचं सोडून करदात्यांच्या हितासाठी उभे राहा. रेल्वेस्थानक परिसर आणि पदपथ हे फेरीवाले मुक्त ठेवणं तुमचं काम आहे. न्यायालयाचेही तसे निर्णय आहेत.  कायदा तुमच्या बाजूनं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य विसरु नका अशी समज राज ठाकरे यांनी सर्व अधिका-यांना दिली आहे.

तसेच या पत्रासोबत राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रतही जोडली आहे. स्थानिक माहापलिका विभागीय कार्यालयं आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी हे पत्र पाठवलं आहे.

COMMENTS