मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एकत्रित येणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार असून शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शरद पवार एकचा मंचावर दिसणार आहेत.
दरम्यान या नाट्यसंमेलनाच्या समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य केलं असल्याची माहिती आहे. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावर जोरदार राजकीय फटकेबाजी पहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS