लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या एका जागांसाठी राजस्थानमध्ये धामधूम सुरू, तीनही जागा राखण्याचं भाजपपुढं कडवं आव्हान !

लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या एका जागांसाठी राजस्थानमध्ये धामधूम सुरू, तीनही जागा राखण्याचं भाजपपुढं कडवं आव्हान !

जयपूर – राजस्थानमध्ये याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्याच्या आधी राज्यात लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे. 29 जानेवारीला मतदान तर 1 फ्रेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.

अजमेर आणि अलवर या दोन लोकसभा आणि मांडलगढ या विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. सध्या या तीनही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तीनही जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला धक्का देऊन त्यांचं मॉरल डाऊन करण्याची काँग्रेसची व्युवरचना आहे. अलवरमध्ये काँग्रेसनं माजी खासदार करणसिंह यादव यांना उमेदवारी घोषित केली आहे.

अजमेर लोकसभेसाठी भाजपनं अजूनही उमेदवार घोषित केलेला नाही. यापूर्वी या मतदारसंघाचं प्रतिनित्व प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी केलं आहे. मात्र यावेळी काँग्रेस या ठिकाणी उमेदवार देताना अतिशय काळजी घेत आहे. भाजपनं उमेदवार देण्याची वाट काँग्रेसकडून पाहिली जात आहे. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यनंतर काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे. माजी आमदार रघु शर्मा आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामस्वरुप चौधरी यांची नावे चर्चेत आहेत.

मांडलगढ विधानसभा पोटनिवडणुकीसाठीही अजून दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले नाहीत. बुधवारी या संदर्भात पक्षाचे प्रभारी अविनाश पांडे यांच्य अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली. मात्र अंतिम निर्णय झाला नाही. इथंही काँग्रेस भाजप उमेदवार कोण देते याची वाट पहात आहे. मांडलगढमधून माजी आमदार विवेक धाकड हे प्रबळ दावेदार आहेत. गेल्या निवडणुकीतही त्यांनी ही जागा लढवली होती. भाजपच्या उमेदवाराडून त्यांना 18,540 मतांनी पराभव झाला होता. मात्र जिल्ह्यातून त्यांना विरोध होत असल्याचं बोललं जातंय. धाकड यांच्याशिवाय माजी आमदार प्रदीप कुमार सिंग माजी मुख्यमंत्री शिवचरण माथुर यांची मुलगी वंदना माथुर यांनीही काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.

भाजपमध्येही उमेदवार ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे. बुधवारी मुख्यमंत्री वसंधराराजे यांनी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक केली. सध्या भाजपनं तीनही जागांसाठी नावे निश्चित केल्याची माहिती आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. अजमेरमधून रामस्वरुप लांबा, अलवरमधून जसवंत सिंह यादव आणि मांडलगढमधून शक्तीसिंह हाडा यांची नावे निश्चित झाल्याचं कळतंय.

COMMENTS