खासदार निधीवरून डाॅ. प्रीतम मुंडे यांच्यावर टीका करणा-या विरोधी पक्षनेत्यांचा खोटेपणा उघड -भाजप

खासदार निधीवरून डाॅ. प्रीतम मुंडे यांच्यावर टीका करणा-या विरोधी पक्षनेत्यांचा खोटेपणा उघड -भाजप

बीड – खासदार निधीवरून डाॅ प्रितम मुंडे यांच्यावर टीका करणा-या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी म्हटलं आहे. जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात खासदार निधीतून २६ कोटीच्या ७७९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून १३ कोटी ७० लाखाची ५२८ कामे देखील पूर्ण झाली असून या आकडेवारीमुळे राष्ट्रवादीचे नेते आता पुरते तोंडघशी पडले असल्याचे पोकळे यांनी म्हटलं आहे.

खासदार फंड खर्च न करणा-या भाजप खासदाराला मतदान करणार का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केज येथे एका बैठकीत करून खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्यावर टीका केली होती. कुठलीही माहिती न घेता किंवा खातरजमा न करता ऐकीव माहितीच्या आधारे त्यांनी खा. डाॅ. प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली असल्याचं पोकळे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंडे यांनी आतापर्यंत पालकमंत्री पंकजा मुंडे किंवा खासदार डाॅ प्रितम यांच्यावर जे जे आरोप केले त्यात कुठलेच तथ्य नसते हे वेळोवेळी उघड झाले आहे, आता पुन्हा एकदा या प्रकाराने ते तोंडघशी पडले असल्याचा पलटवार रमेश पोकळे यांनी केला आहे.

नियोजन विभागाचे सत्य ; डोळे उघडून पहा

खासदार-आमदार निधीच्या खर्चाचा वार्षिक ताळेबंद आखणा-या शासनाच्या जिल्हा नियोजन विभागाने खासदारांच्या शिफारशीने गेल्या पाच वर्षात किती निधी प्राप्त झाला आणि किती खर्च झाला याची आकडेवारी दिली आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत खासदार निधीतून २६ कोटी ११ लाख ६४ हजार इतक्या निधीच्या ७७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून पूर्ण झालेल्या कामांची संख्या ५२८ इतकी आहे, त्यावर १३ कोटी ७० लाख ७२ हजार इतका खर्च झाला आहे. केंद्र सरकारकडून १२ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाल्याचेही विभागाने म्हटले आहे. दरम्यान, आमच्या नेत्यांवर टीका करण्याआधी धनंजय मुंडे यांनी नीट माहिती घ्यावी असा सल्लाही जिल्हाध्यक्ष पोकळे यांनी दिला आहे.

COMMENTS