दिल्ली – धर्मा पाटील प्रकरण आणि भ्रष्टाचाराची काही प्रकरणे यामुळे वादात अडकलेल्या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रावल यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं स्प्षटीकरण प्रदेशाध्यक्षांकडे दिल्याचं कळतंय. तसंच दानवे यांनीही या प्रकरणात काहीही तथ्य नसल्यामुळे पक्ष रावल यांच्या पाठिमागे असल्याचं म्हटलं आहे असं कळतंय. थोडक्यात दानवे आणि भाजपने रावल यांना या प्रकरणात क्लिनचिट दिल्याचं दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसात रावल यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तोरणमाळ हिल रिसॉट या कंपनीशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा जयकुमार रावल यांनी केला होता. मात्र झी 24 तास या खाजगी वाहिनीने रावल यांचा दावा पुराव्यानिशी खोडून काढला आहे. तोरणमाळ रिसॉटचे संचालक असल्याचा आणि त्याच्या सातबारावर रावल यांचं नाव असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रावल यांच्यापुढच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय. आता स्पष्ट प्रतिमा असलेले मुख्यमंत्री इतर मंत्र्यांप्रमाणे यांनाही क्लिनचिट देतात की खडसे यांच्याप्रमाणे राजीनामा घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS