अभिनेता रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत जशास तशी!

अभिनेता रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांची घेतलेली मुलाखत जशास तशी!

मुंबई – ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळा काल पार पडला. या सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उद्धव ठाकरे यांना पॉवर आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक रोहित शेट्टी या बॉलिवूडमधील कलाकारांनाही गौरवण्यात आलं. रितेश देशमुखला महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला.

या सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुखने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. रितेशच्या प्रश्नांना फडणवीसांनी दिलखुलास उत्तरं दिली. ही मुलाखत वाचा जशास तशी ….

रितेश : तुम्ही सत्तेत आल्यापासून ‘सामना’तून बाण चालवण्यात येतायत. कधी त्यांनी स्वबळाची भाषा केली, कधी तुम्ही आपल्याला कोणाची गरज नसल्याचं म्हटलं. चार वर्ष हे सुरु होतं, मात्र निवडणूक जवळ येताच तुमचे हसरे चेहरे दिसले. तुम इतना जो मुसकुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो?

फडणवीस : आम्ही आधीच ठरवलं, जो बित गया वो बित गया. आता नव्याने सुरुवात करुया. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याची सवय आहे. देशात असंगाशी संग सुरु आहे. एकमेकांचे चेहरेही न पाहणारे एकत्र हात उंचावत आहेत. आम्ही एकमेकांबरोबर नेहमीच होतो. चांगल्यातही आणि वाईटातही. काही मतभेद होते, पण व्यापक हितासाठी मतभेद दूर करुन महाराष्ट्र आणि देशासाठी एकत्र आलो म्हणून चेहऱ्यावर डबल हसू आहे.

रितेश : दिलजमाई चित्रपटाच्या मेकिंग मागील स्टोरी काय? दिग्दर्शक-पटकथा लेखक कोण?

फडणवीस : ही दिलजमाई मातोश्रीवर गेल्यानंतर झाली. रश्मी वहिनींनी वडे, साबुदाणा खिचडी असे वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही.

रितेश : 2014 मध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला 63. हे गणित असताना शिवसेनेला 144 जागा आणि भाजपलाही तितक्याच. अशामुळे भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेला अॅडव्हांटेज मिळाल्याचं वाटत आहे.

फडणवीस : राजकीय वास्तविकता असते, युती करताना ते दोन पावलं मागे गेले आहेत, आम्ही दोन पावलं मागे गेलो, ते पुढे आले, तर आम्हीही पुढे आलो. प्राप्त परिस्थितीत राज्यासाठी जे चांगलं आहे, ते आम्ही करु, कार्यकर्ते समजून घेतील. आम्ही एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची आंतरिक इच्छा होती. त्यामुळे तेही खुश आहेत.

रितेश : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न आहे, चुकून युती आलीच तर उपमुख्यमंत्री कोण होणार आणि मुख्यमंत्री कोण?

फडणवीस : चुकून का? युतीच येणार. सब चीजे यहा नही बताई जाती. मुख्यमंत्रिपद कोणाला, उपमुख्यमंत्रिपद कोणाला, हे सगळं ठरलं आहे, योग्य वेळी सस्पेन्स उलगडणार

रितेश : आमच्या सिनेमाला थिएटरमध्ये रिकाम्या खुर्च्या दिसल्या, की वाईट वाटतं. पुण्यात आपल्या सभेत रिकाम्या खुर्च्या होत्या, आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? ज्या भाजप कार्यकर्त्यांनी सभा आयोजित केली होती, ते सध्या पक्षातच आहेत का?

फडणवीस : ते भाजपमध्येच आहेत. सुरुवातीला, लोक येत आहेत, असं आयोजक म्हणत होते. शाळेत बसलो. चहा प्यायलो. पण लोकच येईना. उमेदवारही आले नाहीत. शेवटी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले, आमच्याकडे सभा आहे? आम्हाला तर माहितीच नाही. शेवटी बापट साहेब (गिरीश बापट) आले. त्यांना सांगितलं तुम्हीच भाषण करा. त्यांनी सभेला संबोधित केलं, मी पुढच्या सभेला निघून गेलो. त्या सभेला माणसं नसली, तरी चारही प्रभागात उमेदवार आमचेच निवडून आले.

रितेश : राजकारणात अभिनयाचे गुण किती आवश्यक असतात?

फडणवीस : अभिनय येणं हा अतिरिक्त फायदा आहे. पण राजकारणात केवळ अभिनय करुन लोकांना नेहमी फसवता येत नाही. लोकांशी संवाद साधता येणारं काहीतरी असावं लागतं. कोणाचे हावभाव चांगले असतात, तर कोणाची शब्दफेक. त्यामुळे लोकांची नाळ लगेच जुळते. जे लोकांमध्ये जाऊन काम करतात, त्यांना लोक डोक्यावर घेतात. राजकीय क्षेत्रात अभिनय येणं, हे आवश्यक नाही, पण आला तर उत्तम.

रितेश : मुख्यमंत्री म्हणून अभिनयाची सर्वाधिक गरज कधी भासते?

फडणवीस : मला सहसा राग येत नाही. मात्र काही परिस्थितीमध्ये आपण आक्रोशित आहोत, आपल्याला राग आला आहे, असं दाखवावं लागतं. अशावेळी मी अभिनय करुन रागावलो असल्याचं दाखवतो.

रितेश : अनेक मंत्रिमंडळात येऊ इच्छिणारे भेटतात, तेव्हा अभिनय कसा असतो?

फडणवीस : मला एका पत्रकाराने याची गुरुकिल्ली सांगितली. स्वर्गीय विलासराव देशमुख सांगायचे, अधिवेशन झालं की मग विस्तार आहे. त्यानंतर सांगायचे पुढच्या अधिवेशनाच्या आधी विस्तार आहे. यावर त्यांनी इतकी वर्ष काढली. मी तेच केलं. राजकारणात आशा कोणीच सोडत नाही, त्यामुळे गेली साडेचार वर्ष माझं यावर भागलं.

रितेश : मराठी माणसामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असं तुम्ही म्हणाला होतात.  महाराष्ट्रातून पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायला आवडेल? शरद पवार की नितीन गडकरी?

फडणवीस : 2019 आणि 2024 तर बुक आहे. महाराष्ट्रातून पंतप्रधान तर झालाच पाहिजे, पण नेमकं कोण, यावर 2025 मध्ये चर्चा करुयात.

रितेश : विदर्भ वेगळा झालाच, तर विदर्भाचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल की महाराष्ट्राचा?

फडणवीस : खरं तर हेडलाईनसाठी अनेक गोष्टी देऊ शकतो. पण विकास झाला पाहिजे, ही विदर्भाच्या प्रत्येक माणसाची भावना आहे. अन्यायामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी आहे. मराठवाड्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मी मराठवाडा आणि विदर्भाला त्यांच्या वाट्याच्या गोष्टी दिल्या. पण एक नागपूरकर महाराष्ट्राचा विचार करतो, याचा मला अभिमान आहे. तरी टॉप प्रायोरिटी मराठवाडा आणि विदर्भालाच देणार असल्याचॆ त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS