अकोला – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असून आगामी निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाव्यात ही संघाची इच्छा असल्याचं वक्तव्य गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीत जर मोदींचीच चलती राहिली तर कायदे करुन त्यापुढे कधीच निवडणुका होणार नाहीत. अशी तजविज ते करतील, असं भाकितही हार्दिक यांनी केलं आहे. याउलट जर भाजप आणि एकूणच एनडीएला कमी जागा मिळाल्या तर मोदींना बाजूला करुन नितीन गडकरींना पंतप्रधान करणे संघाला सोपे होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
दरम्यान हार्दिक पटेल हे विदर्भ युथ फोरमच्या एल्गार मेळाव्यात आले होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्यावेळी राज्यातील काँग्रेस नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. नागपूर ही आधी दीक्षाभूमी आहे. नंतर हवे तर त्याला संघभूमी म्हणता येईल, अशी खोचक टिप्पणीही हार्दिक पटेल यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करत त्यांच्या हक्कांसाठी आपण तुरुंगातही जायला तयार असल्याची ग्वाही हार्दिक पटेल यांनी दिली आहे. दरम्यान हार्दिक पटेल यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
COMMENTS