डोंबिवलीत सापडलेला शस्त्रसाठा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्यासाठी आणला असण्याची शक्यता – सचिन सावंत

डोंबिवलीत सापडलेला शस्त्रसाठा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्यासाठी आणला असण्याची शक्यता – सचिन सावंत

मुंबई – आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानेच भारतीय जनता पक्षाने धार्मिक ध्रुवीकरणाचा व दंगली पेटवण्याचा घाट घातला आहे. डोंबिवलीत सापडलेला शस्त्रसाठा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्यासाठी आणला असण्याची शक्यता असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करायला तयार आहे. भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली असून सत्ता व पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न भाजपने विविध राज्यात यापूर्वीच केले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप दंगली घडवणार आहे की काय? अशी शंका डोंबिवलीचे भाजप उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या दुकानातून जप्त केलेल्या प्रचंड शस्त्रसाठ्यामुळे निर्माण झाली आहे असे सावंत म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मुंबईजवळ नालासोपारा येथे सनातन संस्थेच्या साधकांकडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडे जिवंत बॉम्बचा मोठा साठा सापडला होता. नालासोपा-यातील बॉम्बसाठा दंगली घडवण्यासाठीच वापरला जाणार होता असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. डोंबिवली आणि नालासोपारा या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे सापडली. या दोन्ही घटनांमध्ये समानता दिसून येत आहे. त्यामुळे सनातन संस्था, शिवप्रतिष्ठान आणि भाजप यांच्यामध्ये नेमके काय संबंध आहेत? हे समोर आले पाहिजे. तसेच या दोन्ही संघटनांवर सरकारकडून कारवाई केली जात नाही, यावरून भाजपला त्यांच्याबद्दल प्रेम आहे असे दिसून येते. या प्रेमाचे कारण या घटनांच्या मागे दडलेले असू शकते.  हे समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत घातक आहे. या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच राज्यभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घराची व आस्थापनाची झडती घेण्याची आवश्यकता असल्याचे सावंत म्हणाले.

COMMENTS