नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लावलेल्या आरोपावरुन लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांचा गदारोळ गेली तीन ते चार दिवसांपासून सुरु आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे. याबद्दल मोदी यांनी राज्यसभेत येऊन माफी मागितली पाहिजे, असा आग्रहही काँग्रेसनं केला आहे. याच मुद्दावरुन गुरुवारीही राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. या गदारोळाचा फटका खासदार सचिन तेंडूलकरला बसला आहे. क्रीडा क्षेत्राविषयी महत्त्वाच्या मुद्यांवर सचिन संसदेत प्रथमच बोलणार होता. परंतु काँग्रेसच्या या गदारोळामुळे राज्यसभेत बोलण्याची सचिन तेंडूलकरची संधी हुकली आहे.
क्रीडा क्षेत्रातील विविध विषयांवर बोलण्यासाठी सचिननं वेळ मागितली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी दोन वाजता सचिनला संधी देण्यात आली होती. परंतु ज्यावेळी सचिन बोलण्यासाठी उभा राहिला त्यावेळीही काँग्रेसच्या सदस्यांचा जोरदार गदारोळ सुरु होता. त्यावेळी सभातींनी काँग्रेसच्या सदस्यांना शांत बसण्याचे आवाहन केले परंतु तरीही काँग्रेसच्या सदस्यांचा गोंधळ सुरु होता. त्यामुळे जवळपास दहा मिनिटे सचिन तसा शांतपणे सभागृहात उभा राहिला. हा गदारोळ तसाच सुरु राहिल्यामुळे सचिन तेंडूलकरची सभागृहात बोलण्याची संधी गुरुवारी हुकली असल्याचं दिसून आलं आहे.
COMMENTS