मुंबई – विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तोगडीया यांच्या गायब होण्याच्या प्रकरणावरुन सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टार्गेट करण्यात आलं आहे.
‘सामना’त काय म्हटलंय ?
नको असलेली माणसे ‘गायब’ करण्याचे प्रकार रशिया व चीनच्या कम्युनिस्ट राजवटीत घडले आहेत. कदाचित पाकिस्तान, इराकमध्येही घडले असतील. आणीबाणीत राजकीय विरोधकांना ‘पंगू’ करण्यासाठी शासन यंत्रणेने गुंडगिरी केली व त्यास इंदिराजींचे बळ मिळाले, पण हिंदुस्थानात आता हिंदुत्ववाद्यांनाच भय व दहशत वाटत असेल तर मोदी व शहा यांनी पुढे येऊन खुलासा करायला हवा. नवी राजवट आल्यापासून लालकृष्ण आडवाणींसह अनेकांची ‘वाचा’ गेली आहे. हे भय आहे की मौन आहे हादेखील एक प्रश्न आहेच, पण प्रवीण तोगडियांनी जे घडले त्यास ‘वाचा’ फोडली आहे. मात्र त्यांचे अश्रू हिमतीचे नसून भीतीचे आहेत. देश भयाच्या सावटाखाली आहे काय?
मकर संक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक तोगडियांना अटक करण्यासाठी घरी गेले. त्या वेळी ते पूजा करीत होते. ‘एक माणूस माझ्याकडे धावत आला व त्याने मला सांगितले की, तुम्ही आताच्या आता कार्यालय सोडा, तुम्हाला ताब्यात घेऊन तुमचे एन्काऊंटर करण्यासाठी लोक निघाले आहेत.’ राजस्थानचे पोलीस येत आहेत असे समजताच तोगडिया यांनी राजस्थानचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आम्ही कोणत्याही प्रकारच्या पोलिसांना गुजरातला पाठवले नसल्याचे या दोघांनी सांगितले. त्यानंतर तोगडिया हे घराबाहेर पडले व नंतर बेपत्ता झाले. बेशुद्ध अवस्थेत सापडले. हे सर्व प्रकरण म्हणूनच धक्कादायक व विचित्र वाटत आहे. तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते कुणी सोमेगोमे नाहीत. त्यांच्या अटकेसाठी राजस्थानचे पोलीस येतात व गुजरात पोलिसांना त्याची खबर नसावी हे संशयास्पद आहे.
COMMENTS