तामिळनाडूत आज निवडणुका झाल्या तर काय होईल ?  वाचा सविस्तर इंडिया टुडे आणि कार्वाचा सर्व्हे !

तामिळनाडूत आज निवडणुका झाल्या तर काय होईल ?  वाचा सविस्तर इंडिया टुडे आणि कार्वाचा सर्व्हे !

चेन्नई – जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूचे राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी अभिनेता रजनीकांत यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. मात्र राज्यातल्या राजकीय पोकळीचा पूर्ण फायदा त्यांना घेता येणार नाही. इंडिया टुडे आणि कार्वा यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे.

तामिळनाडूमध्ये आज निवडणुका झाल्या तर रजनिकांत यांच्या पक्षाला 234 पैकी केवळ 33 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसंत त्यांच्य पक्षाला केवळ 16 टक्के मते मिळतील असंही सर्व्हे सांगतो. तर मुख्यमंत्री म्हणूनही रजनिकांत यांना केवळ 17 टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचं सर्व्हेमध्ये पुढं आलं आहे. जयललितांच्या निधनामुळे सर्वाधिक वाताहात त्यांच्या पक्षाची होताना दिसत आहे. जयललिता यांच्या अण्णा द्रमुकला केवळ 68 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.

तामिळनाडूत निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा सर्वाधिक फायदा हा द्रमुकला होताना दिसत आहे. द्रमुक आणि त्यांच्या आघाडीला मिळून राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. द्रमुक आघाडीला 234 पैकी तब्बल 130 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंत द्रमुक नेते एम के स्टॅलिन यांना मिळाली आहे. तब्बल 50 टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना 11 टक्के मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. दुसरे अभिनेते कमल हसन यांना राज्याच्या राजकारणात फारसा परिणाम होणार नसल्याचं या सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. कमल हसन यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ 4 टक्के मतदारांचा पाठिंबा आहे.

जयललितांच्या निधनामुळे अण्णा द्रमुकं नेतृत्वहीन झाला आहे. सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना 11 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला असला तरी अण्णा द्रमुकची मते मोठ्या प्रमाणात रजनिकांत यांच्या पक्षाकडे वळत असल्याचं सर्व्हेमध्ये आढळून आलं आहे. अण्णा द्रमुकची नाराज तब्बल 60 टक्के मते रजनिकांत यांच्याकडे वळत आहेत. तर 26 टक्के मते ही द्रमुककडं वळत असल्याचं सर्व्हेमध्ये दिसन आलं आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री पलानीसामी यांची कामगिरी अत्यंत खराब असल्याचं तब्बल 63 टक्के मतदारांनी सांगितलं आहे.

रजनिकांत यांनी पक्षाचं नाव अजून जाहीर केलं नाही. तसंच प्रचारासाठीही ते अजून बाहेर पडले नाहीत. ते प्रचारासाठी बाहेर पडल्यानंतर काही प्रमाणात राजकीय परिस्थितीत बदल होऊ शकतो. मात्र रजनिकांत यांचं मूळ बाहेरचं असणं त्यांना काही प्रमाणात महागात जाईल असं मतदारांना वाटतंय. त्यावर त्यांना मात करावी लागेल.

COMMENTS