श्रीपाद छिंदमवर ‘राष्ट्रद्रोहाचा’ गुन्हा दाखल करा –संभाजी ब्रिगेड

श्रीपाद छिंदमवर ‘राष्ट्रद्रोहाचा’ गुन्हा दाखल करा –संभाजी ब्रिगेड

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा अवमान केल्याबद्दल अहमदनगर’चे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. एका उपमहापौरानंच शिवजयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचं पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष  संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे. श्रीपाद छिंदम हे आरएसएसशी संबंधित असून आज भाजपमधील सगळ्यांच्या मनातली विचारधारा स्पष्ट झाली असून संघाचे हेच अंतिम सत्य असल्याचा आरोपही संभाजी ब्रिगेडनं केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरूष आहेत. ‘राष्ट्रपुरूषांची बदनामी हा राष्ट्रद्रोह आहे.’ म्हणून श्रीपाद छिंदम यांच्यावर राज्य सरकारने ‘राष्ट्रद्रोहाचा गुन्हा’ दाखल केला पाहिजे व तो तात्काळ करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसेच शिवप्रेमींच्या भावना भडकलेल्या आहेत. उपमहापौरांचे हे वक्तव्य सामाजिक तेढ निर्माण करणारे असून संतापजनक आहे. म्हणून मा. मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांचे उपमहापौरपद रद्द करावे’ व त्यांच्यावर ‘राष्ट्रद्रोहाचा गुन्हा’ तात्काळ दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. कारण सरकारच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्र पेटल्या शिवाय राहणार नाही. कृपया ते होणार नाही याची काळजी ही घ्यावी असंही संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.

 

COMMENTS