समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यास श्रीहरी अणेंचा  विरोध !

समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यास श्रीहरी अणेंचा विरोध !

मुंबई – मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी या मागणीचं निवेदन शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं. परंतु या महामार्गाला नाव देण्यास माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विरोध दर्शवला आहे.

समृध्दी महामार्ग हे नाव वाईट आहे काय ? असा सवाल अणे यांनी केला आहे. शिवेसनेच्या एकाही नेत्यानं विदर्भासाठी काहीही केलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेच्या एकाही नेत्याचं नाव या महामार्गाला नको असल्याचं श्रीहरी अणे यांनी म्हटलं आहे.

समृद्धी महामार्गाला शिवसेनेनं सुरूवातीला विरोध केला होता. मात्र त्यांचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. राज्य सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. काही मुद्यावर शिवसेनेनं याला विरोध केला होता. आता शिवसेनेनं या महामार्गाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याची मागणी केली आहे. याचा अर्थ शिवसेनेचा याला असलेला विरोध आता मावळला आहे. त्यातच शिवसेनेला चुचकारण्यासाठी आणि खूश करण्यासाठी मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या नावाला हिरवा कंदिल देतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच अणे यांच्या विरोभाबाबतही मुख्यमंत्री काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलं आहे.

 

 

COMMENTS