सनातन विरोधातील तपास संथपणे का ?  इंडियास्कूप वेबसाईटच्या रिपोर्टवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे – काँग्रेस

सनातन विरोधातील तपास संथपणे का ?  इंडियास्कूप वेबसाईटच्या रिपोर्टवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे – काँग्रेस

मुंबई – सनातन संस्थेशी संबंधित अतिरेकी कारवाया करणा-यांचा तपास करणा-या दहशतवाद विरोधी पथकाला तपास मंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे इंडिया स्कूप डॉट कॉम या वेबसाईटने प्रसिध्द केलेल्या रिपोर्टमधून समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईजवळ नालासोपारा येथे सनातनच्या साधकाकडे जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सनातनच्या काही साधकांना अटकही करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने आरोपींचा मोठ्या प्रमाणात घातपात करण्याचा कट होता हे स्पष्ट आहे. याचे धागेदोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या बड्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सखोल चौकशी झाल्यास अनेक बड्या लोकांवर कारवाई होऊ शकते. असे झाल्यास भाजप सरकार हिंदू विरोधी आहे असा संदेश जाईल म्हणून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या तपासावर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी जाणिवपूर्वक तपास मंद करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहेत असे सदर रिपोर्टमध्ये म्हटले आहे, मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे असे सावंत म्हणाले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातही महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक कर्नाटक एसआयटीला सहकार्य करत नाही, असेही इंडिया स्कूप डॉट कॉम या वेबसाईटच्या दुस-या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे सत्य असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छाशक्ती नाही असेच दिसते आहे. नालासोपारा बॉम्ब साठा प्रकरणात संभाजी भिडेच्या शिवप्रतिष्ठानशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली आहे पण दहशतवाद विरोधी पथकाने अद्याप संभाजी भिडेची साधी चौकशीही केली नाही. तसेच सनातन संसथेच्या साधकांना अटक करण्यात आल्यानंतरही सनातनच्या जयंत आठवलेंचा साधा जबाबही पोलिसांनी घेतला नाही. त्यामुळे सदर वेबसाईटचा रिपोर्ट सत्य असल्याची शक्यता अधिक दिसते. या प्रकरणातल्या ख-या गुन्हेगारांपर्यंत हा तपास पोहोचेल की नाही अशी शंका सावंत व्यक्त केली.

COMMENTS