संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर राज्यसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य!

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर राज्यसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य!

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढणार आहे. राज्यसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची जास्त मतं आहेत. काँग्रेसचीही मतं आहेत, त्यामुळे सातवी जागा आम्ही जिंकू शकतो आणि त्या जागेसंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानुसार ती जागा यावेळेला राष्ट्रवादीकडे आहे. त्या जागेवर पवार साहेबांनी फौजिया खान यांची उमेदवारी जाहीर केली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तसेच शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

26 मार्चला राज्यसभा निवडणूक

देशभारतील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्चला मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी म्हणजे 26 मार्चला संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल. महाराष्ट्रातील 7 जागांचाही यामध्ये समावेश आहे. एकूण 17 राज्यांतून 55 सदस्य राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.

COMMENTS