नवी दिल्ली – प्रभू रामचंद्रही भाजपच्या विरोधात गेले असल्याची जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
उत्तर प्रदेश, बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होत असल्याचं दिसून येत आहे. याबाबात ‘यूपीतील योगी सरकार फेल ठरल्याचं हे द्योतक असून भाजपनं आता हवेत उडणं सोडून द्यायला हवं. हा समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या आघाडीचा विजय नसून भाजपचा पराभव असंल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. यूपीतील गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकानं आघाडीवर आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याच मतदारसंघात भाजपचा पराभव होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या भाजपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तसेच भाजपच्या या पराजयामुळे देशभरातील विरोधक टीका करत आहेत. त्यातच राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही ही संधी सोडली नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ‘सप व बसपनं काम केलं म्हणून त्यांना पोटनिवडणुकीत विजय मिळाला, असं आम्ही मानत नाही. याचं कारण वेगळं असून प्रभू रामचंद्रांची सर्वाधिक निंदानालस्ती करणारे समाजवादी पक्षाचे नेते नरेश अगरवाल यांना पक्षात घेण्यासाठी भाजपनं पायघड्या घातल्या, त्याच दिवशी भगवान राम भाजपच्या विरोधात गेले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच भाजपच्या या पराभवावर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सप आणि बसपचा ‘हा मोठा विजय असून शेवटाची सुरुवात करून दिल्याबद्दल मायावतीजी आणि अखिलेश यादवजी यांचे अभिनंदन’ करत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तर भाजपच्या या पराभवानं काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. ‘शेतकरी, युवा व महिलाविरोधी धोरणं राबविणाऱ्या सरकारला ही चपराक आहे. जनता भाजपला सत्तेबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे हाच या निकालांचा अर्थ आहे,’ असं काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS