राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी पक्षाच्या आमदारांना दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण सल्ला !

राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी पक्षाच्या आमदारांना दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण सल्ला !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला असल्याची माहिती आहे. आमदारांनी आता आपल्या मतदारसंघात जाऊन कामाला सुरुवात करावी. अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे, त्याबाबत त्यांना दिलासा देण्याचं काम करावं. आपण ज्या मतदारसंघात निवडणूक जिंकली आहे तिथं जाऊन नेत्यांनी आभार दौरे करावेत असं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या सत्तावाटपाबाबत चर्चा झाली. तसेच सध्या राजकीय अस्थिरतेचं चित्र आहे. राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निवडणुका होणार का?, याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या मनातही हीच भीती आहे. याबाबत शरद पवारांनी आमदारांच्या बैठकीत आमदारांनी चिंता करू नये, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक होणार नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS