पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ताधारी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांचे पक्षांतर होत असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. मागील काही महिन्यात आघाडीमधील काही नेते मंडळी सत्ताधारी भाजप आणि सेनेत जाताना दिसत आहेत. अशीच परिस्थिती १९८० सालीदेखील झाली होती. ती परिस्थिती आणि आताची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. त्यावेळी जे सत्ताधारी पक्षात गेले होते, त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आम्ही नव्याने तसेच ताकदीने पुन्हा उभा राहिलो होतो. आतादेखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असं पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान जे पक्षातून गेलेत त्याबद्दल काही चिंता वाटत नाही. तसेच आघाडीतील काही नेत्यांना ‘तुमची ईडी आणि अन्य काही विभागामार्फत चौकशी लावू’, असे सांगण्यात येत असल्याचे ऐकण्यात आले आहे. अशा प्रकाराच्या दबाव तंत्रामुळे आघाडीमधील नेत्यांना भाजप आणि सेना ओढून घेत आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याचे मी आजवर कधीही पाहिलं नसल्याचंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS