शरद पवार यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीसाठी अखेर मुहूर्त मिळाला!

शरद पवार यांच्या बहुप्रतिक्षित मुलाखतीसाठी अखेर मुहूर्त मिळाला!

पुणे – जागतिक मराठी अकादमीतर्फे ‘शोध मराठी मनाचा’  हे 15वे जागतिक संमेलन जानेवारी महिन्यात संपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तत्कालीन परिस्थितीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. शरद पवार यांची ही बहुप्रतिक्षित मुलाखत बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.  बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2018 रोजी, संध्याकाळी 5.00 (पाच) वाजता, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी), डेक्कन, पुणे येथे ही मुलाखत होणार असून ही मुलाखत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे, अशी माहिती  जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली आहे.

मुक्त संवाद… दोन पिढ्यांचा या विशेष संकल्पनेवर आधारित  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची ही मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत. यातून पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडला जाणारा आहे. या मुलाखतीद्वारे रसिकांना एका मनमोकळ्या आणि महाराष्ट्राची स्थिंतत्यरे सांगणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा संवादाचे साक्षिदार होण्याची संधी मिळणार आहे. याचवेळी मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  तसेच कला-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील योगदान देणा-या मराठी व्यक्तींचा यावेळी विशेष गौरव करण्यात येणार आहे.

COMMENTS