भुजबळांचे काही बरे वाईट झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल, शरद पवारांचं सरकारला पत्र  !

भुजबळांचे काही बरे वाईट झाले तर त्याला सरकार जबाबदार असेल, शरद पवारांचं सरकारला पत्र !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. छगन भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत अशी मागणी पवार यांनी केली आहे. भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असणार असल्याचं शरद पवार यांनी पत्रातून म्हटलं आहे.

तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र भुजबळांना जेजे रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाहीत, अशी तक्रार त्यांच्या समर्थक आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत केली होती. तसेच त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी, यात राज्य सरकारने लक्ष घालावं अशी मागणीही आमदारांनी विधिमंडळात केली होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ८ मार्च रोजी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

काय म्हणालेत पत्रात ?

गेली काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या सतत बिघडत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला फार चिंता वाटत आहे. त्यांचं वय 71 वर्ष असून ते 14 मार्च 2016 पासून (2 वर्ष) तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालील आहे. भुजबळांचं प्रकरण पूर्णपणे कायदेशीर आहे. माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत कोर्ट अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल. “जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे.” हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही.

छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून 50 वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही. माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे.छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे.

मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असणार आहे. असं या पत्रात शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS