पुणे – डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी साळुंखे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यास पुणे येथे उपस्थित राहताना मला मनापासून आनंद वाटला. डॉ. साळुंखेंचं सबंध लिखाण बघितल्यानंतर माणूस विचार करायला लागतो, आश्चर्य वाटायला लागतं की, सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यामध्ये खाडेवाडी नावाच्या लहानशा गावात शेतकरी कुटुंबामध्ये यांचा जन्म झाला. शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना नंतरच्या उभ्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने साहित्य आणि संस्कृतीच्या नीतिमत्तेच्या संबंधाने त्यांनी जे लिखाण केलं त्यामुळे त्यांचा अभिमान वाटतो असं नाही तर त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावसं वाटतं. असे गौरोद्गार त्यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले आहेत
महाराष्ट्रातले एक अग्रगण्य लेखक, विचारवंत, संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक अशी डॉ. आ. ह. साळुंखेंची ओळख आज महाराष्ट्राला आहे. आयुष्यातील ३०-३२ वर्षांचा कालखंड त्यांनी साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये ज्ञानदानामध्ये घालवला. पार्श्वभूमी मी मगाशी सांगितलेली अशी असतानासुद्धा संस्कृत घेऊन बीए-एमएला पहिल्या वर्गात आले. डॉक्टरेट संपादित करण्यातही यशस्वी. हिंदीचं ज्ञान संपादन करण्याच्या परीक्षेतही यशस्वी. एवढंच नव्हे तर शिवाजी विद्यापीठाच्या विद्या शाखेच्या डीनची जबाबदारीसुद्धा अत्यंत समर्थपणे त्यांनी सांभाळली होती.
विविध विषयांवर त्यांनी लिखाण केलं. वाईची प्राज्ञ पाठशाळा ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्वानांची खास संस्था. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारख्या एका थोर विचारवंताच्या नेतृत्वाखाली चाललेली ही संस्था. धर्मशास्त्रावर शंभरपेक्षा अधिक लेख लिहून प्राज्ञ पाठशाळेमध्ये डॉ. साळुंखे यांनी आपला ठसा उमटवला. ज्या पद्धतीने मे. पुं. रेगे असतील, रा. ग. जाधव असतील, या सगळ्यांनी पाठ्यशाळेत शास्त्रीबुवांच्या तोडीस तोड अशा पद्धतीचं लिखाण करण्याच्या संबंधीची कामगिरी केली. त्याच मालिकेमध्ये डॉ. आ. ह. साळुंखेचा उल्लेख करावा लागेल. मी अनेकदा त्याठिकाणी जात असे. शास्त्रीबुवांशी सुसंवाद करण्यासाठी. शास्त्रीबुवांकडून अनेकदा त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रकर्षाने उल्लेख व्हायचा. त्यात डॉ. साळुंखेंचा उल्लेख सातत्याने व्हायचा.
डॉ. साळुंखे यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचा प्रत्येक ग्रंथ हा विचारप्रवर्तक अशा प्रकारचा आहे. समाजातील दुर्लक्षित घटक आहे, ज्याला न्याय देण्याची आवश्यकता आहे अशा विषयांवरची लिखाण त्यांनी अतिशय उत्तम रीतीने केलं. मग त्यात हिंदू संस्कृती आणि स्त्री असो, सबंध समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता. स्त्रीला दुर्लक्षित करण्यासंबंधी व अतिशूद्र समजण्यासंबंधी समाजामध्ये भूमिका होती. त्याविषयावर त्यांनी अतिशय उत्तम लिखाण केलेलं आहे.त्यांच्याकडून यापुढेही असेच विचारप्रवर्तक लिखाण होत राहो ही मनोकामना. त्यांना या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी चिंतितो.
COMMENTS