अजित पवारांचा शपथविधी ते पंतप्रधान मोदींची ऑफर, शरद पवारांनी केला मोठा खुलासा!

अजित पवारांचा शपथविधी ते पंतप्रधान मोदींची ऑफर, शरद पवारांनी केला मोठा खुलासा!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि पंतप्रधान मोदींनी भेटीत दिलेली ऑफर याबाबत पवार यांनी आपलं मन मोकळं केलं आहे. एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हा खुलासा केला आहे.

अजित पवारांच्या शपथविधीवर काय म्हणाले पवार?

फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाल्यानंतर मला सकाळी 6 वाजता फोन आला. मला सुप्रियाने सांगितलं, अजितने शपथ घेतली आहे. या गोष्टीवर माझा विश्वासच बसला नव्हता. सुप्रिया चांगलीच चिडलेली होती. मला तिने हे सांगितल्यावर मी लगेचच टीव्ही लावला. शपथविधीची दृश्यं पाहत असतानाच मला अजितसोबत राष्ट्रवादीचे जे लोक दिसले ते सगळेच माझ्या विश्वासातले होते. मला कळून चुकलं या सगळ्यांना माझं नाव सांगूनच तिथे नेण्यात आलं असावं. ही गोष्ट उमगल्यानंतर माझी खात्री झाली की मी अजितचं हे बंड मोडून काढू शकतो. मी लगेचच उद्धव ठाकरेंना फोन केला आणि ही स्थिती निवळेल, असा विश्वास दिला. त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली. असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं आहे.

अजित पवारांची नाराजी ?

नेहरू सेंटरमधल्या बैठकीत माझी काँग्रेसच्या नेत्यांशी सत्तास्थापनेवरून नव्हे तर दुसऱ्याच एका कारणावरून वादावादी झाली. या टोकाच्या वादानंतर मी त्या बैठकीतून बाहेर पडलो. ही बैठक झाल्यानंतर अजित राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांना म्हणाला, आत्ताच काँग्रेसचे नेते असं करतायत तर सत्ता स्थापन झाल्यानंतर काय होईल? त्यानंतर त्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि गटनेता म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र सादर केलं. असंही पवार म्हणाले.

भाजपसोबत जाण्याला मी कधीच हिरवा कंदिल दिला नव्हता !

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करता येईल का याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून विचारणा होत होती. त्यावर अजित पवारांनी, आपण भाजपशी चर्चा करूया, अशी भूमिका मांडली. त्यावर शरद पवार म्हणाले, मी त्याला सांगितलं की चर्चा करायला काहीच हरकत नाही. ते काय म्हणतायत ते ऐकून घ्यावं. हे बोलणं झाल्यानंतर अजित पवारांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली परंतु असं असलं तरी भाजपसोबत जाण्याला मी कधीच हिरवा कंदिल दिला नव्हता असं पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांशी झालेल्या भेटीत मोदींनीच पुन्हा एकदा हा विषय काढला होता. पण भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची आमची इच्छा नाही हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं.पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असं जे काही म्हटलं जातं ते खरं नाही. मात्र त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदं देण्याची ऑफर दिली होती. परंतु भाजपसोबत जायचचं नसल्याने मी ती ऑफर नाकारली असंही पवार या मुलाखतीत म्हणाले आहेत.

COMMENTS