शरद पवार यांची खासदार गोपाळ शेट्टींवर टीका !

शरद पवार यांची खासदार गोपाळ शेट्टींवर टीका !

पुणे – पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमाला शरद पवार यांनी काल हजेरी लावली. या कार्यक्रमात शरद पवार यांचा फरची टोपी देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली. खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेल्या ख्रिश्चनांवरील वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. भाजपच्या एका खासदाराने म्हटले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चनांचा सहभाग नव्हता. ॲनी बेझंट स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी ख्रिश्चन होत्या हे विसरतां येणार नाही. सत्ताधा-यांना देशवासियांमध्ये द्वेशाचं वातावरण तयार करायचंय, आपल्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी ते होऊ द्यायचं नाही, देशात बंधुभाव कायम ठेऊन सुख,शांती प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपली असल्याचंही यावेळी पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज देशाची स्थिती वेगळी आहे. त्यांच्या हातात सत्ता असते त्यांची जबाबदारी असते की समाजात बंधुभाव वाढावा, मात्र त्याची कमतरता दिसत आहे. त्यामुळे प्रगती खुंटली असून आज सर्वत्र हल्ले होत आहेत. ख्रिश्चनावर हल्ले होत आहेत, मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. आज कोणी काय खावं हे देखील ते सांगत आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना ही फर टोपी घालण्यास विरोध आहे, ज्या मौलाना आझादांनी देशाला स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले, त्यांची टोपी घालण्यात कसली लाज आहे असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS