पुणे – भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं म्हटलं होतं. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून पवार यांनी मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असं म्हटलं आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान या बैठकीनंतर शरद पवार यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी सेंटरमधील कोविड सेंटरला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी डॅशबोर्ड प्रणालीची देखील माहिती घेतली. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पुण्याचे जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पण अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे एकीकडे व्यवहार पूर्वपदावर आणायचे आहेत, तर दुसरीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवायचे आहेत. यासाठी काय उपाययोजना करायला हवेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली.
COMMENTS