मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं आज निधन झालं. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून किडनीच्या आजारावर त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरु होते. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचं अखेर निधन झालं आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरुड येथे उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळाथ हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी सांगली येथे झाला होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहे. एक संयमी नेता म्हणून त्यांची ओळख होती. शिवाजीराव देशमुख हे १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. तत्पूर्वी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे त्यांचे पुत्र होत.
धनंजय मुंडे यांचा शोक संदेश
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख साहेबांच्या निधनाने ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जुळलेले, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.संसदीय लोकशाही आणि विधिमंडळ परंपरेचा सखोल अभ्यास असलेले ते नेते होते.सुरवातीच्या काळात शासकीय सेवेत काम करताना त्यांनी ग्रामीण भाग पायी पिंजून काढला होता.विधान परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी सभागृहाचा गौरव वाढवला. आज मी माझे ज्येष्ठ मार्गदर्शक गमावले आहेत.
COMMENTS