मुलायमसिंह यादव यांचे भाऊ शिवपाल यादव काँग्रेसच्या वाटेवर !

मुलायमसिंह यादव यांचे भाऊ शिवपाल यादव काँग्रेसच्या वाटेवर !

लखनऊ – उत्तर प्रदेशात काँग्रेसला अच्छे दिन येत असल्याचं चित्र आहे. बसपाचे बडे नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काँग्रेसची वाट धरल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील बडे हस्ती मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपाल यादव हेही काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. अखिलेश यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर शिवपाल यादव तसे पक्षापासून दूर गेले आहेत. मुलायमसिंह यांच्या प्रेमाखातर ते अखिलेश यांच्याविरोधात फारसे आक्रमक नव्हते. मात्र अखिलेश यांच्यापुढे मुलायमसिंह यांचेही काही चालेना अशी स्थिती आहे. त्यामुळेच आता शिवपाल यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यातूनच ते काँग्रेसच्या संपर्कात आहे. त्यांनी काँग्रेसकडे उत्तर प्रदेशचे अध्यक्षपद मागितले असल्याची बातमी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.

काँग्रेसने मात्र अजूनतरी त्यांना प्रदेशाध्यक्षाबाबत आश्वासन दिलेले नाही. यादव घरण्याचा गढ असलेल्या आसपासच्या तीन चार जिल्ह्यात त्यांनी लक्ष घालावे अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. मात्र शिवपाल यांना राज्याचे अध्यक्षपद हवे आहे.  शिवपाल यादव यांच्याबाबत काँग्रेस हायकमांड द्विधा मनस्थितीत असल्याचं बोलंलं जातंय. कारण शिवपाल यादव यांना पक्षात घेतल्यास अखिलेश यादव नाराज होतील अशी भिती काँग्रेसला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र करण्याचा प्रक्रियेला खिळ बसेल अशी भीती काँग्रेस हायकमांडला वाटत आहे. त्यामुळेच आता शिवपाल यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो ते पहावं लागेल. मात्र शिवपाल काँग्रेसमध्ये आल्यास काँग्रेसला नक्कीच फायदा होईल असं राजकीय अभ्यासकांना वाटतंय.

COMMENTS