भास्करराव जाधव यांच्यासाठी शिवसेनेचे ‘स्पेशल विमान’ !

भास्करराव जाधव यांच्यासाठी शिवसेनेचे ‘स्पेशल विमान’ !

मुंबई – शिवसेनेच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नेते भास्करराव जाधव यांच्यासाठी शिवसेनेनं स्पेशल विमान पाठवलं आहे. स्पेशल विमानाने जाधव रत्नागिरीहून औरंगाबादला रवाना झाले आहेत. औरंगाबादला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. आमदारकीचा राजीनामा देऊन आजच पक्ष प्रवेश व्हावा म्हणून शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन जाधव लगेच मुंबईत येणार आणि मातोश्रीवर त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

दरम्यान पक्षांतर करताना नियमाप्रमाणे आधी त्यांना विधानभवनात जाऊन विधानसभा अध्यक्षांकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार अहे. मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे औरंगाबादमध्ये आहेत. अध्यक्ष विधानभवनात नसतील तर त्यांच्या सचिवांकडे राजीनामा अर्ज देता येतो. तो अर्ज सचिव फॅक्स किंवा ईमेलद्वारे अध्यक्ष जिथे असतील तिथे पाठवतात. त्यावर अध्यक्षांची स्वाक्षरी झाली की राजीनामा मंजूर होतो, अशी सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भास्कर जाधव हेदेखील अशाचप्रकारे आज राजीनामा देणार होते.
मात्र जाधव यांचा राजीनामा मंजूर होण्यास विलंब अथवा कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच राजीनामा देऊन ते शिवसेनेत दाखल होतील असं दिसत आहे.

COMMENTS