“का झुकलात ते सांगा?”, शिवसेनेचा भाजपला सवाल

“का झुकलात ते सांगा?”, शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई – केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये बदल करण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून भाजपला लक्ष्य करण्यात आलंय. आजच्या सामनाच्या संपादकीयमधून ’’का झुकलात ते सांगा?” असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?

-‘जीएसटी’ अभेद्य आहे. जीएसटीच्या करप्रणालीत कोणताही बदल होणार नाही. जीएसटीला सामान्य लोकांचा पाठिंबा असून दलाल आणि करबुडवे व्यापारीच जीएसटीच्या विरोधात आकांडतांडव करीत आहेत’, असे कालपर्यंत सांगणाऱ्यांनी याप्रश्नी सरळ ‘यू टर्न’ घेतला आहे.

-जीएसटीतील काही सैतानी तरतुदींना विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना देशाचे शत्रू वगैरे ठरविण्यापर्यंत सत्ताधारी पक्षाची व त्यांच्या मंत्र्यांची मजल गेली होती. आपणच कौटिल्याचे बाप असून देशाचे व गरीबांचे अर्थशास्त्र फक्त आम्हालाच समजते अशा तोऱ्यात वावरणाऱ्यांचे गर्वहरण शेवटी जनतेनेच केले. लोकक्षोभापुढे सरकार झुकले.

-छोटय़ा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ढोल सत्ताधारी पक्षातर्फे वाजविले जात आहेत. कोणत्याही विषयात राजकीय लाभ व प्रसिद्धी कशी मिळवायची यात ही सर्व मंडळी आघाडीवर आहेत. किंबहुना साखरपुडय़ालाच पाळणा आणून बारशाचे सोपस्कार आटोपून स्वतःच्या कर्तृत्वाचे पेढे वाटावेत ते या मंडळींनीच.

-सरकार याप्रश्नी झुकणारच नव्हते. लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध गेला उडत असे सांगणारे सरकार इतके नरमले कसे? या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात निवडणुकीत त्यांना होत असलेला प्रखर विरोध.

-ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लोकांना गावबंदी केली आहे. त्यांच्या पत्रकार परिषदा होऊ दिल्या जात नाहीत. त्यांची पोस्टर्स चौकातून उतरवली जात आहेत. स्वतः अमित शहा यांना प्रचारासाठी रस्त्यावर उतरावे लागले व पंतप्रधान मोदी हे तर ५०-५० सभा घेऊन भाजपचा प्रचार करणार आहेत.

-महाराष्ट्राप्रमाणेच राज्याराज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हे त्यांची कामेधामे सोडून व देश-राज्य वाऱ्यावर टाकून गुजरात निवडणुकीतील प्रचारासाठी तंबू ठोकून बसणार आहेत. पैसाही तुफान फेकला जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अर्थात जीएसटीमधून घेतलेली माघार हा निवडणूकपूर्व भ्रष्टाचार असून छोटय़ा व्यापाऱ्यांच्या मिशीला तूप लावण्याचाच प्रकार आहे.

-‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ असे जे आता गमतीने बोलले जात आहे त्यात चुकीचे काहीच नाही. जीएसटीच्या विरोधात बोलणारे कालपर्यंत देशाचे व अर्थव्यवस्थेचे मारेकरी ठरले होते. मग या देशाच्या मारेकऱ्यांचे ऐकून सरकार का झुकले याचा खुलासा व्हायला हवा.

-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली व नोटाबंदीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली हे सत्य मनमोहन सिंग यांच्यासारखे सरळमार्गी व सचोटीचे अर्थतज्ञ सांगत आहेत, पण ‘‘मनमोहन सिंग कोण?’’ या गुर्मीत बोलणाऱ्यांना गुजरातच्या सामान्य जनतेने जमिनीवर आणले आहे.

-छोटा व्यापारी हा जगण्यास पात्र नाही काय? हा देश जितका अंबानी-अदानीचा आहे तितकाच तो छोटय़ा व्यापाऱ्यांचा आहे.

-नोटाबंदीमुळे उद्योगात मंदी येऊन लाखो लोकांचे रोजगार बंद झाले असतील तर आम्ही त्या नोटाबंदीच्या विरोधात उभे आहोत. जीएसटी ही नवी समान करप्रणाली देशाला मजबूत अर्थव्यवस्था खरोखरच देत असेल तर त्यास विरोध करण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करणार नाही, पण हीच जीएसटी मुंबईसारख्या शहरांना केंद्राचे आर्थिक गुलाम बनवणार आहे. म्हणून आम्ही मुंबईच्या स्वाभिमानासाठी उभे ठाकलो.

-कालपर्यंत जे देशाचे दुश्मन व अर्थव्यवस्थेचे मारेकरी होते त्यांच्या पुढे का झुकलात, ते सांगा. लहान व्यापाऱ्यांच्या मिशीला करसवलतीचे तूप का लावलेत या प्रश्नाचे उत्तर मिळेल काय? ‘गुजरात में फटी तो जीएसटी घटी’ हेच या प्रश्नाचे उत्तर आहे!

 

COMMENTS