मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपनं पुन्हा एकदा युती केली आहे. या युतीच्या घोषणेनंतर आज कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात आला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तसेच या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात येणार असून नाणार प्रकल्पासाठी निघालेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आज सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. नाणार प्रकल्प रद्द झाला असला तरी जिथे स्वागत होईल तिथे हा प्रकल्प होऊ शकतो असे सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेली काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात अडकलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला आहे.
दरम्यान नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिकांसह शिवसेनेनं जोरदार विरोध केला होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, निसर्गाची हानी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे युतीची घोषणा करण्यापूर्वी शिवसेनेनं भाजपसमोर हा प्रकल्प रद्द करण्याची अट ठेवली होती. त्यानंतर आज अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
COMMENTS