मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक 2 मंत्रीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे सहा नेते शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे दोन मंत्री उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील. तर उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी राजभवनमध्ये 3 डिसेंबरला होणार आहे. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद असणार असल्याची चर्चा होती. परंतु उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपदाऐवजी विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाचे नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 3 तासांहून जास्त चर्चा झाली. या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अहमद पटेल, जयंत पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते हजर होते.
या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादीकडेच असणार आहे. तर विधानसभेचं अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहणार आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्येक पक्षाचा एक किंवा दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हे मंत्री कोण असणार आहे, याबद्दलचा निर्णय आज रात्री होईल, अशी माहिती पटेल यांनी दिली आहे.उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार हा 3 डिसेंबर अर्थात विश्वासदर्शक ठराव पास केल्यानंतर होणार आहे, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.
COMMENTS