मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडे आणि कोकणातून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून तिस-या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. हिंगोली-परभणी येथून विधानपरिषदेसाठी विपुल बजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली असून विपुल बजोरिया हे शिवसेनेचे अकोला-बुलडाणा विधानपरिषदेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बजोरिया यांचे चिरंजीव आहेत. तसेच शिवसेनेने केलेल्या घोषणेनंतर आता भाजप याठिकाणी उमेदवार देणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान या मतदारसंघात शिवसेनेचं संख्याबळ जास्त असून आम्ही स्वबळावर निवडणूक जिंकू, असा दावा गोपीकिशन बजोरिया यांनी केला आहे. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS