मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. परंतु युती तोडण्याबाबत आता शिवसेनेतच दोन गट पडले असल्याचं दिसून येत आहे. कारण शिवसेनेतील काही खासदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युती तोडण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती करत आहेत. जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पाठिंब्यावर विधानपरिषद किंवा राज्यसभेत असलेले नेते या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याची माहिती आहे.
दरम्यान लोकमतने दिलेल्या बातमीनुसार लोकसभेतील एका खासदाराने याबाबत भाष्य केलं आहे. 2014 साली भाजपाशी युती केल्यामुळे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी देशभरात मोदी लाट होती. यावेळी भले मोदी लाटेचा तितकासा प्रभाव नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल. मात्र, हे नुकसान सीमित ठेवायचे असेल तर शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय पर्याय नसल्याचं या खासदारानं म्हटलं आहे. तसेच युती न केल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या पाच ते सहाच जागा जिंकता येतील. ही बाब आम्ही उद्धवजींच्या लक्षात आणून दिली असल्याचंही या खासदाराने म्हटलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान पालघर पोटनिवडणुकीचे उदाहरण देत पालघरमध्ये शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावूनही श्रीनिवास वनगा यांना भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे शिवसेनेने वास्तव स्वीकारले पाहिजे. तसेच युती तोडल्यास भाजपाचे नुकसान होईल, पण त्यामध्ये शिवसेनेचा फायदा काय?, असा सवाल या खासदाराने विचारला असून 2019 च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व वाढेल व पक्षाला महत्त्वाची खाती पदरात पाडून घेता येतील असा मतप्रवाह अनेक खासदारांमध्ये असल्याचंही या खासदारानं म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत उद्धव ठाकरे पुनर्विचार करुन काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS