शिवसेना नांदेड फॉर्म्युला लोकसभेसाठी वापरणार ?

शिवसेना नांदेड फॉर्म्युला लोकसभेसाठी वापरणार ?

मुंबई – राज्याच्या आणि देशाच्या सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र असे तरी दोन्ही पक्षाचे संबध सध्या पुन्हा जुळण्यापलीकडे गेले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांना कसं संपवता येईल याचाच विचार करत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. आणि सध्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुक तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे.

भाजप शिवसेना वेगवेगळे लढले तर त्यातून मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटकाही दोन्ही पक्षाला बसू शकतो आणि आघाडीला फायदा होऊ शकतो. तसाच काहीसा प्रकार नांदेडमध्ये झाला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना ही अशोक चव्हाण आणि काँग्रेसची बी टीम असल्याची टीका केली. शिवसेना जिंकण्यापेक्षा भाजपला हरवण्यावर लक्ष देत होती अशीही टीका झाली. आणि शिवसेनेचा भाजपला लोळवण्याचा हेतू साध्य झाला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या बोलीवर नांदेडसारखा फॉर्म्युला लोकसभेसाठी शिवसेना वापरू शकते असं सांगितलं. शिवसेनेचे चार पाच खासदार जरी निवडूण आले तरी चालतील मात्र आम्ही भाजपचे किमान 20 उमेदवार पाडू शकतो अशी मांडणी त्या नेत्याने केली. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीसोबत काही ठिकाणी राजकीय अंतर्गत अडजेस्टमेंट करता येईल असंही त्या नेत्याने  सांगितलं.

अर्थात नांदेडमध्ये मतविभागणीचा फायदा काँग्रेसला झाला असं सरसकट म्हणणं काँग्रेसवर काहीसं अन्यायकारक होईल. अनेक ठिकाणी शिवसेना भाजपच्या उमेदवारांच्या मतांच्या बेरजेपेक्षा काँग्रेसच्या उमेदवाराची मते जास्त आहेत. मात्र काही ठिकाणी मतविभागणीचा फायदा काँग्रेसला झाला हे नक्की.  अर्थात राजकारणात उद्या काय होईल हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे लोकसभेलाही अगदी असंच होईल असं सागंता येत नाही. मात्र सध्याची स्थिती विचारात घेतली तर असं होऊ शकतं एवढच आपण म्हणू शकतो.

COMMENTS