मुंबई – काँग्रेसच्या आमदाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. कारण ते आमदार काँग्रेसचे आहेत. त्यांनी बॅनरवर फोटो भाजप नेत्यांचे छापले तर आज त्यांना शिवसेनेनं ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे. हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून मुंबईतील वडाळा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर हे आहेत. कारण कोळंबकर यांनी काही दिवसांपूर्वी लावलेल्या गणेशभक्तांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे नेते गायब झाले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणि मुबंईतील विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचे फोटो लावले होते. त्यामुळे कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अशातच आज त्यांना शिवसेनेनं ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे. तसेच कोळंबकर हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे कोळंबकर सध्या काय करतात? कुठे आहेत? आणि कोणत्या पक्षात जाणार? यावर सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
कालिदास कोळंबकर
दरम्यान कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मात्र राणेंचा फोटोही त्यांच्या होर्डिंग्जवर नसल्याचं पहावयास मिळालं. कोळंबकर हे पूर्वीचे शिवसैनिक असून शिवसनेच्या तिकीटावर ते आमदार झाले होते. मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेंव्हा कोळंबकर हे त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. तेंव्हापासून ते वडाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेस सोडणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामध्ये या पोस्टरमुळे भर पडली आहे. अशातच त्यांना शिवसेनेनंही ऑफर दिली असल्याची माहिती आहे.
नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. त्यामुळे कोळंबकर हे त्या पक्षात जातील अशीही शक्यता वर्तविली जात आहे. राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर नितेश राणे यांनी कोळंबकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी आपण राणेंसोबत असल्याचं कोळंबकर म्हणाले होते.
मात्र सध्याच्या होर्डिंग्जवरुन त्यांनी वेगळाच संदेश दिला आहे. अशातच शिवसेनेनंही ऑफर दिली असल्याचं बोललं जात असल्यामुळे कोळंबकरांचं सध्या काय चालू आहे ? ते आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत जातात? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS