पोटनिवडणुकीचे राजकारण रंगले, शिवसेनेच्या रणनितीतून 2019 ची झलक !

मुंबई – राज्यात लागलेल्या लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीसाठी या महिन्यात मतदान होणार आहे. या निवडणुकांमुळे राज्यातलं राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात उदयाला आलेली राजकीय समिकरणे ही 2019 च्या निवडणुकीची झलक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषतः शिवेसनेची या पोटनिवडणुकीतील भूमिका म्हणजे 2019 च्या निवडणुकीमधील झलक असणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडेही राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपचा कसा पराभव होईल अशाच पद्धतीनं शिवसेना पावले उचलत आहे. पालघरमध्ये दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे निवडणूक लागली आहे. खरंतर राज्यातली तीनपैकी एकही जागा न लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या हायकमांडनं घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र भाजपने वनगांच्या कुटुंबियांना उमेदवार न देता इतर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. वनगा कुटुंबियांची नाराजी हेरून शिवसेनेनं तातडीनं पावलं उचलली. सावरा कुटुंबियांना थेट मातोश्रीवर आणून त्यांच्या हातात शिवबंधन बांधले. एवढच नाही तर चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

चिंतामण वनगा हे भाजपचे निष्ठावंतांपैकी एक होते. संघाच्या मुशीतून तयार झालेले वनगा यांचा पालघर जिल्ह्यात चांगलाच दबदबा होता. तर विष्णू सावरा यांचा एक गट जिल्ह्यात आहे. वनगा आणि सावरा कुटुंबीय हे हार्डकोअर भाजपचे आहेत. त्यामुळेच श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीचा थेट फटका भाजपला बसणार आहे. त्याचसोबत शिवसेनेची मते आणि वनगा कुटुंबियांची मते या जोरावर बाजी मारू असे आखाडे शिवसेनेनं आखले आहेत. त्यामध्ये किती यश येईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र शिवसेनेने उमेदवार दिल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. हे मात्र नक्की.

दुसरीकडे शिवसेनेने भंडारा गोंदियामध्ये उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात काही पॉकेट्स सोडले तर शिवसेनेची फारशी ताकद नाही. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीच्या आधी अपशकून नको आणि झाकली मुठ सव्वालाखाची हा विचार करत शिवसेनेने भंडारा गोंदियात उमेदवार दिलेला नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्या पसंतीचे मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार दिला नसला तरी अंतर्गत शिवसेना आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. या ठिकाणी काँग्रेसने पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी भाजपने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी शिवसेनेनं थेट काँग्रसचे उमेदवार विश्वजीत कदम यांना पाठिंबा दिला आहे. भले पतंगराव कदम यांच्याशी शिवसेनेचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे शिवसेनेनं निर्णय घेतला असला तरी भाजपला हरवणे हाही छुपा उद्देश यामागे दडला आहे.

थोडक्यात शिवसेनेने या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपली 2019 मध्ये काय रणनिती असेल याची झलकच दाखवली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. म्हणूनच या निकालांकडे केवळ राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत भाजपनं जागा राखल्या तर भाजपचा आत्मविश्वास नक्की वाढणार आहे. मात्र भाजपचा पराभव झाल्यास देशभरात भाजपविरोधी वातावरण आहे या विरोधकांच्या म्हणण्याला आणखी बळ येणार आहे.

 

COMMENTS