…त्यामुळे गोपाळ शेट्टींना ‘गुन्हेगार’ ठरवून हल्ले केले – शिवसेना

…त्यामुळे गोपाळ शेट्टींना ‘गुन्हेगार’ ठरवून हल्ले केले – शिवसेना

मुंबई – भाजपचे खासदार  गोपाळ शेट्टी यांची बाजू घेऊन शिवसेनेने सामना आग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ख्रिश्चन समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवून भाजपाने गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.  देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चनांनी सहभाग घेतला नव्हता असे वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केले होते. तसेच भारताला हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र लढा देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे गोपाळ शेट्टींवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच गोपाळ शेट्टींनी केलेल्या या वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांची कानउघडणी केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर त्यांनी निर्णय बदलला. यावरुनच शिवसेनेनं गोपाळ शेट्टी यांची बाजू घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.

 सामना संपादकीय

ओडिशात आदिवासींची धर्मांतरे करणाऱया फादर स्टेन्सची त्याच्या मुलासह निर्घृण हत्या झाली तेव्हा संपूर्ण ख्रिस्ती जग हादरले. ओडिशाचे त्यावेळचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक यांना काँग्रेस नेतृत्वाने तडकाफडकी हटवले. ‘व्हॅटिकन चर्च’चा दबाव आला व ‘‘सोनिया गांधी या कॅथलिक असल्यामुळे इतक्या तडकाफडकी हटवले’’ अशी टीका तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी केली, पण आता गोपाळ शेट्टींच्या बाबतीत काय झाले? माफीसाठी, माघारीसाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आला. आता तर सत्तेत सोनिया गांधीही नाहीत व केंद्राने ‘व्हॅटिकन’च्या दबावाखाली निर्णय घ्यावा अशी परिस्थितीदेखील नाही. तरी गोपाळ शेट्टी हे गुन्हेगार का ठरले? शेवटी हे राजकारण आहे. २०१९ च्या निवडणुकीत ख्रिश्चन बांधवांना चुचकारण्याचा हा प्रयोग आहे. भाजपचे हे ‘निधर्मी’ रूप आता स्पष्ट व प्रकाशमान होताना दिसत आहे. अर्थात हा सर्व भाजपचा अंतर्गत विषय आहे, पण एका विषयाने वातावरण ढवळून निघाले. आम्ही आमची मते व्यक्त केली इतकेच.

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या एका वक्तव्यावरून नव्या वादास तोंड फुटले आहे. गोपाळ शेट्टी यांनी सहज केलेले ते विधान आहे. त्यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे (मागायला लावली). त्यामुळे विषयास पूर्णविराम मिळायला हरकत नाही. शेट्टी असे म्हणाले की, ‘देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले होते. मात्र इंग्रजांचे देशावर राज्य असल्याने ख्रिश्चनांचा या लढय़ात मोठय़ा प्रमाणावर सहभाग नव्हता.’ या वक्तव्यामुळे ‘ख्रिश्चन’ समाज जेवढा भडकला नसेल तेवढे आपले विविध राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत; कारण इथे ख्रिस्ती बांधवांच्या प्रेम-आदराचा विषय नसून सरळसरळ मतपेटीचा विषय आहे; म्हणून गोपाळ शेट्टी यांना ‘गुन्हेगार’ ठरवून हल्ले केले गेले. प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ख्रिश्चनांवरील वक्तव्यावरून भाजपच्या दिल्लीतील सर्वोच्च हायकमांडने गोपाळरावांना झापले व माफी मागायला लावली. या दाबदबावामुळे भावनाविवश शेट्टी हे खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाले. माझ्या ‘वाणी स्वातंत्र्यावर’ अशी गदा येत असेल तर नको ते पद, अशी भूमिका शेट्टी यांना घ्यावी लागली. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल. हिंदुत्ववादी ‘भाजप’ राजकारणासाठी ‘सेक्युलर’ होत आहे व सर्वच धर्माचे लोक त्यांना हवे आहेत. त्यामुळे अयोध्येत रामजी कायमचे वनवासात गेले तरी चालतील. पालघरची लोकसभा निवडणूक येनकेनप्रकारे जिंकावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील चर्चेस व मिशनऱयांच्या पायऱया झिजवल्या. तोसुद्धा एक राजकीय कावेबाजपणाच होता व तेथील ख्रिश्चन बांधवही त्या

कावेबाजपणास भुलला

हे आता मान्य करावे लागेल. अर्थात या देशातील ख्रिस्ती समाजाच्या देशभक्तीवर आणि राष्ट्रनिष्ठेवर कधीच कोणी शंका घेऊ नये. इंग्रजांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे सांगणारे आमचे हिंदू नेतेही होतेच, म्हणून त्या हिंदू नेत्यांच्या स्वातंत्र्य भक्तीविषयी शंका घ्यायच्या काय? पण हिंदुस्थानी स्वातंत्र्य लढय़ाची मुहूर्तमेढ रचणाऱयांत ऍनी बेझंट, ऍलन हय़ुमसारखे लोक होते व ते ख्रिश्चन होते. ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध येथे कोणी बोलायला तयार नव्हते व क्रांतीची बीजे रुजवायला वेळ लागत होता, तेव्हा ऍनी बेझंट, ऍलन हय़ूमसारख्यांनी त्या बीजास पाणी घालण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्याच्या लढय़ात भले बोटावर मोजण्याइतके असतील, पण स्वातंत्र्यसैनिक ख्रिश्चन होते व त्यांचा खारीचा वाटा तेव्हा मोठा होता. हिंदुस्थानच्या तिन्ही सेनादलांत ख्रिस्ती अधिकारी मोठय़ा प्रमाणावर आहेत व अनेकांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे. या देशात मुसलमान मोठय़ा संख्येने आहेत. तितका ख्रिश्चन समाज नाही. त्यामुळे तो खारीचा वाटाही मोलाचा आहे. गोव्यातील पोर्तुगालांचे राज्य ही ख्रिश्चन राजवट होती, पण त्या राजवटीविरुद्ध लढणारे जसे हिंदू होते तसे ख्रिश्चनही होते. मुसलमान जसा ‘मक्के’कडे पाहून सर्व निर्णय घेतो तसे ख्रिश्चनांचे मन व डोळे हे रोमच्या व्हॅटिकन चर्चकडे असतात आणि ख्रिस्ती समाजाच्या प्रसारासाठी हिंदुस्थानसारखे गरीब देश त्यांनी निवडलेले आहेत. त्यातून धर्मांतरे व संघर्ष निर्माण झाले. पोर्तुगीजांवर निष्ठा दाखविणारे लोक आजही गोव्यात आहेत व ईशान्येकडील राज्यात ख्रिश्चनांचे मत मोलाचे आहे. तेथे ख्रिश्चनांचे लांगूलचालन सगळेजण करतात, पण धर्मप्रसारासाठी मुसलमानांनीही हाती तलवार घेतली आहे.

हिंदूंचे शिरकाण

करून त्यांना इस्लामची राजवट प्रस्थापित करायची आहे व हे शिरकाण निदान कश्मीर खोऱयात रोखणे हिंदुत्ववादी भाजपला जमलेले दिसत नाही. याउलट ख्रिश्चनांचे आहे. धर्मांतरे घडवून ख्रिस्ती धर्माचा विस्तार करायचा हे त्यांचे जगभराचे सूत्र आहे व त्यासाठी ‘व्हॅटिकन’मधून मोठा निधी येत असतो. यातून मधल्या काळात काही पाद्रय़ांचे खून झाले. चर्चेसवर हल्ले झाले; पण गरीब, आदिवासी लोकांत ‘भूक’ हा सैतान वाढला आहे. त्यामुळे धर्मांतरे वाढली असतील तर त्यास आमचे राज्यकर्ते जबाबदार आहेत. गुजरातमधील डांग येथे ख्रिस्ती मिशनऱयांविरुद्ध उद्रेक झाला. ओडिशातील जंगलात आदिवासींची धर्मांतरे करणाऱया फादर स्टेन्सची दोन दशकांपूर्वी त्यांच्या मुलासह निर्घृण हत्या झाली तेव्हा संपूर्ण ख्रिस्ती जग हादरले. ओडिशाचे त्यावेळचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक यांना काँग्रेस नेतृत्वाने तडकाफडकी हटवले. ‘व्हॅटिकन चर्च’चा दबाव आला व ‘‘सोनिया गांधी या कॅथलिक असल्यामुळे इतक्या तडकाफडकी हटवले’’ अशी टीका तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी केली, पण आता गोपाळ शेट्टींच्या बाबतीत काय झाले? माफीसाठी, माघारीसाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आला. आता तर सत्तेत सोनिया गांधीही नाहीत व केंद्राने ‘व्हॅटिकन’च्या दबावाखाली निर्णय घ्यावा अशी परिस्थितीदेखील नाही. तरी गोपाळ शेट्टी हे गुन्हेगार का ठरले? शेवटी हे राजकारण आहे. २०१९ च्या निवडणुकीत ख्रिश्चन बांधवांना चुचकारण्याचा हा प्रयोग आहे. भाजपचे हे ‘निधर्मी’ रूप आता स्पष्ट व प्रकाशमान होताना दिसत आहे. अर्थात हा सर्व भाजपचा अंतर्गत विषय आहे, पण एका विषयाने वातावरण ढवळून निघाले. आम्ही आमची मते व्यक्त केली इतकेच.

 

COMMENTS