मुंबई – राज्यातील सहा आमदारांना पंधरा दिवसात राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण या सहाही आमदारांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं आहे. त्यामुळे हे सहाही आमदार विधानसभा सोडून लोकसभेत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 11 आमदारांनी आपलं नशिब आजमावलं होतं. या 11 पैकी सहा आमदार लोकसभेत निवडून आले आहेत.
हे आमदार झाले खासदार !
पुण्यातील भाजप आमदार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे बापट आपल्या आमदरकीचा राजीनामा देणार आहेत.
त्याचबरोबर औरंगाबादमधील MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबादमधून पराभव केला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते देखील आता आमदारकीचा राजीनामा देतील.
आमदार सुरेश धानोरकर देखील लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार असलेल्या सुरेश धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये ते विजयी झाले आहे. या निवडणुकीत निवडून येणारे ते काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती. उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.
प्रतापराव पाटील – चिखलीकर यांनी काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा नांदेडमधून पराभव केला. 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील – चिखलीकर शिवसेनेकडून विजयी झाले होते.पण, नांदेड पालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अखेर भाजपनं त्यांना नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्याविरोधात उमेदवारी दिली.
शिवसेनेचे हिंगोलीत उमेदवार आमदार हेमंत पाटील यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना देखील आपल्या उमेदवारीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, श्रीरामपूरमधील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, तसेच जालन्यातील काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड, अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील आमदार के. सी. पाडवी, जसेच धुळ्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना मात्र लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
COMMENTS