नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील 17 पक्षांच्या नेत्यांना एकत्रित आणण्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मंगळवारी म्हणजेच आज हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती आहे. परंतु या कार्यक्रमाला बसपाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे चारही नेते अनुपस्थित राहणार आहेत परंतु हे चारही नेते आपल्या प्रतिनिधींना या कार्यक्रमाला पाठवणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी सोनिया गांधींकडून रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. सर्वपक्षीयांना एकत्रित बोलावून याबाबत त्या स्वतः चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तसेच राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली असली तरीही गुजरात वगळता ईशान्येकडच्या राज्यांमध्ये राहुल गांधी यांना प्रभाव पाडता आला नाही. देशातील २० पेक्षा जास्त राज्ये भाजपाने काबीज केली आहेत. तर चार राज्यांमध्येच काँग्रेसची सत्ता उरली आहे. त्यामुळे विरोधकांची मोट बांधून आपण त्याचे नेतृत्त्व करायचे हे सोनिया गांधी यांनी ठरवलेले यावरुन दिसत आहे. मात्र काँग्रेसची धुरा राहुल गांधींच्या खांद्यावर टाकण्याचा निर्णय बहुदा शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांना पटला नसावा म्हणून ते या डिनर स्नेहभोजनापासून स्वतःला दूर ठेवत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS