एसटीचा संप चौथ्या दिवशीही सुरुच, संप चिघळण्याची चिन्हे

एसटीचा संप चौथ्या दिवशीही सुरुच, संप चिघळण्याची चिन्हे

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. सातवा आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत.  परिवहनमंत्री दिवाकर रावते संप हाताळण्यात अयशस्वी ठरले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणात अद्याप हस्तक्षेप केलेला नाही.

एसटी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने ऐन दिवाळीत राज्यभरात प्रवाशांचे हाल होत आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सुमारे 2500 कोटी रुपयांचा पगारवाढीचा दिलेला प्रस्ताव कर्मचार्‍यांनी नाकारल्यामुळे आता सरकार आणि कामगार संघटनांमध्ये संघर्ष अटळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कामगार नेत्यांनी प्रस्ताव ठोकरल्यामुळे संतप्त झालेल्या रावते यांनी आता सरकारच्या बाजूने चर्चा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर शुक्रवारपासून कारवाई करण्याच्या प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

कामगार नेत्यांना सुमारे 6 हजार 200 कोटी रुपयांची वार्षिक पगारवाढ अपेक्षित असल्यामुळे त्यांनी ही वाढ अमान्य केली. आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कामगारांना कळविण्यात आले होते. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून या नेत्यांना दिवसभरात काहीही निरोप आला नाही. त्यामुळे एसटीचा संप आणखी चिघळणार, अशी चिन्हे आहेत.

COMMENTS