अमरावती – या राज्याच्या शेवटच्या माणसाच्या प्रश्नासाठी, जे जे संकटं येतील त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईन, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.अमरावतीत शरद पवारांचा सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
या सत्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
अमरावतीशी असलेल्या आठवणींना शरद पवारांनी यावेळी उजाळा दिला. जेव्हा कापसाच्या वाणाला भाव मिळावा म्हणून मी दिंडी काढली, तेव्हा त्या दिंडीत सगळ्यात जास्त लोक अमरावतीतून सहभागी झाले होते. महिलांनी गाड्या भरून भाकरी पाठवल्या होत्या. त्यामुळे अमरावतीशी जुना संबंध आहे, असे शरद पवार म्हणाले. कर्जमाफी कायमचा उपाय नाही. उत्पादन खर्चाचा विचार करुन अधिक 50 टक्क्यांनी त्याला किंमत देणं हा उपाय आहे. दरम्यान चुकीची औषधं येत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र नवीन वाणाला विरोध करु नये. कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं पवारांनी सांगितलं.
COMMENTS